संघर्षातून यशाकडे – माळकवठेच्या नागेश ढाणे यांची प्रेरणादायी कहाणी
माळकवठे…
यश सहज मिळत नाही, त्यामागे असतो वर्षानुवर्षांचा संघर्ष, संयम आणि न थकणारी जिद्द. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे नागेश ढाणे यांची . नागेश यांनी अवघ्या एका-दोन वर्षांत नव्हे, तर तब्बल ९ वर्षे अथक परिश्रम करून महाराष्ट्र शासनाच्या सहाय्यक नगर रचनाकार या पदावर MH Rank 8 आणि NTC मधून प्रथम येऊन आपले नाव कोरले. हा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडथळे, अपयश, आणि समाजाचे टोमणे यांचा सामना करत नागेश यांनी हे स्वप्न पूर्ण केले.
या प्रवासात नागेश यांनी Maharashtra Engineering Service (MES) ची परीक्षा ४ वेळा mains पर्यंत दिली आणि प्रत्येक वेळी अधिक मजबूत होत पुढे गेले. एक क्षण असा आला होता की, नागेश इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले, पण केवळ १.२५ गुणांनी ते मागे राहिले. हा धक्का कुणालाही खचवणारा होता. पण नागेश यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा उभं राहून, नव्या जोमाने प्रत्येक attempt दिला.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक जबाबदाऱ्या होत्या. लग्न झालेलं, दोन गोड मुलींचे वडील, आणि तरीही ते अभ्यास करत होते. समाजाकडून सतत टोमणे ऐकावे लागत होते .
“मुलींचं वय शाळेत जायचं आहे आणि अजूनही हा शिकतोय!”
पण या सगळ्यांवर मात करत, त्यांच्या पत्नीने त्यांना प्रत्येक टप्प्यावर मानसिक आधार दिला. तिचा विश्वास आणि साथ हीच त्यांची खरी ताकद होती. या संघर्षमय प्रवासात त्यांचा भाऊ, जो CRPF मध्ये देशसेवा करत आहे, त्याने पूर्ण आर्थिक जबाबदारी उचलून नागेश यांच्या स्वप्नांना बळ दिलं.
वडिलांच्या निधनानंतर, नागेश यांनी गावात राहून शेतीची पूर्ण जबाबदारी सांभाळली, आणि त्याचसोबत शेती करत अभ्यासही सुरू ठेवला. हा त्यांचा संघर्ष आणि जिद्दीचा सर्वोच्च नमुना होता.
परंतु या यशाच्या आनंदात एक वेदना कायम राहिली — “हे यश पाहण्यासाठी त्यांचे वडील आज आपल्यात नाहीत.”
आज नागेश यांचे यश हे फक्त त्यांचं नाही, तर त्यांच्या कुटुंबाचा त्याग, साथ आणि विश्वास याचं फलित आहे. त्यांची कहाणी प्रत्येकाला सांगते — अपयश शेवट नसतो, तो नव्या सुरुवातीचा मार्ग असतो. जिद्द, सातत्य आणि योग्य साथ असेल, तर यश नक्की मिळतं.
_______________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









