अस्मानी आणि सुलतानी संकट
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ
मंद्रूप:
निसर्गाची अवकृपा आणि बाजारपेठेतील घसरलेले भाव अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मंद्रूप येथील शिवानंद कल्लप्पा जोडमोटे या शेतकऱ्याने अखेर उद्विग्न होऊन आपल्या तीन एकरवरील उभे मूग पीक रोटर फिरवून नष्ट केले . एवढेच नव्हे तर कवडीमोल भावामुळे त्याने एक एकर क्षेत्रातील कोथिंबीरही ट्रॅक्टर चालवून जमीनदोस्त केली. डोळ्यांदेखत सोन्यासारखे पीक मातीत मिळवण्याची वेळ आल्याने परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त होत असून, हतबल झालेल्या या शेतकऱ्याने आता शासनाकडे तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.
चालू हंगामात जोडमोटे यांनी मूग व कोथिंबीर पिकांसाठी मोठा खर्च केला होता. यामध्ये मूग बियाणे (१६०० रुपये प्रति बॅग याप्रमाणे २ नग – ३२०० रुपये), खते ५००० रुपये, पेरणीसाठी ४००० रुपये, कोळपणी ३००० रुपये, औषध फवारणी ८०० रुपये आणि औषधांसाठी १६०० रुपयांचा खर्च झाला होता. कोथिंबीर पिकासाठी तब्बल १९० रुपये किलो दराने धने खरेदी करून पेरणी केली होती. मात्र, बाजारात कोथिंबीर अवघ्या १० रुपयांना ३ पेंढ्या या अत्यंत कमी दराने विकली जात असल्याने काढणीचा खर्चही निघणे अशक्य झाले. हजारो रुपयांचा खर्च करूनही हातात एक रुपयाचेही उत्पन्न आले नाही. अखेर रोटर फिरवण्यासाठी आणखी ३००० रुपयांचा भुर्दंड सहन करावे लागले.
मंद्रूप परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. यामुळे ऊस वाळून गेली असून साखर कारखान्याला देण्यासाठी ऊसच शिल्लक राहिलेला नाही. पाणीटंचाईची भीषणता एवढी वाढली आहे की, शेतातील तब्बल ९ बोअरवेल पूर्णपणे कोरड्या पडल्या असून, आता पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसाअभावी परिसरात मोठी चाराटंचाई निर्माण झाली असून पशूखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. बाजारात कडबा तब्बल ४० रुपये प्रति पेंढी या दराने विकत घ्यावे लागत असल्याने पशुधन कसे जगवायचे, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे.
आता खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर हतबल शेतकरी ‘हस्त’ नक्षत्रात ज्वारी पेरणीच्या तयारीला लागला आहे. मात्र, ‘हस्त’ आणि ‘उत्तरा’ नक्षत्रात जर पाऊस झाला नाही, तर रब्बीचा हंगामही वाया जाईल. पाऊस पडल्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय शेतकऱ्यांसमोर उरलेला नाही.

केवळ तीन एकर शेती असलेल्या या शेतकऱ्यावर बँकेचे पीककर्ज आहे. पीक तर वाया गेले, पण आता मुलांच्या शिक्षणासाठी 80 हजार रूपये खर्च कसा भागवायचा आणि कुटुंबाचा गाडा कसा हाकायचा, या विवंचनेने त्याला ग्रासले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, “आता आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे,” अशी आर्त हाक या शेतकऱ्याने दिली आहे.
शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन मंद्रूप आणि परिसरात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच कर्जमाफी व विशेष आर्थिक उपाययोजना करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकरी जोडमोटे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.
…………………
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*
ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!
सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.











