आमदार निधीमुळे सभापती व जिल्हा परिषद सदस्य यांना वगळले
राजूर शाळा उद्घाटनावरून लोकप्रतिनिधी व शिक्षण अधिकाऱ्यांची उडवाउडवी!
दक्षिण सोलापूर : राजूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या नूतन वर्गखोली उद्घाटनात सभापती व औराद पंचायत समिती सदस्य संदीप टेळे आणि हत्तुर जि.प. सदस्या लक्ष्मीताई पाटील यांना डावलल्याचा वाद चिघळला आहे. उद्घाटन कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याबाबत विचारणा केली असता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिक्षण विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
आमदार सुभाष देशमुख यांच्या आमदार निधीतून राजूर जि.प. शाळेत तीन वर्गखोल्या बांधण्यात आल्या. उद्घाटन सोहळ्याचे नियोजन करताना राजशिष्टाचार धाब्यावर बसवण्यात आला. या परिसरातील लोकप्रतिनिधी असलेल्या पंचायत समिती सभापती आणि जि.प. सदस्यांनाच निमंत्रण दिले नाही, पत्रिकेत नावही छापले नाही. उलट सुलट चर्चा सुरू आहे.
या वादाबाबत माजी केंद्रप्रमुख व प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांना विचारले असता “कार्यक्रमाचे आयोजन स्थानिकांनी केले होते, आमचा संबंध नाही”, “पत्रिका आम्ही छापली नाही”, अशी जबाबदारी झटकणारी उत्तरे मिळत आहेत. तर आयोजक समर्थकांकडून “आमदार निधी आहे, त्यामुळेच फक्त आमदारांना बोलावले” असे सांगितले जात आहे.
नियमानुसार जि.प. शाळेचा कोणताही कार्यक्रम हा शिक्षण विभागाच्या परवानगीने आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणे बंधनकारक आहे. तरीही येथे जाणीवपूर्वक डावलण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रमुखांचा हा उघड अपमान असून, आमदारांच्या उपस्थितीतच शिष्टाचारभंग झाल्याने शिक्षण विभाग दबावाखाली काम करत आहे का ? असा संतप्त सवाल ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींमधून केला जात आहे. त्यामुळे दोषी असणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकारी व शिक्षकांवर लोकप्रतिनिधीकडून काय कारवाई होणार ? याकडे लक्ष लागले आहे.
स्थानिक भाजपामधील अंतर्गत गटबाजीचे शाळा उद्घाटन कार्यक्रमावर परिणाम झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात उद्घाटनाच्या कार्यक्रमाची उलट सुलट चर्चा सुरू आहे . शाळा उदघाटन कार्यक्रम शैक्षणिक असताना स्वार्थासाठी त्याला राजकीय रंग देण्यात आल्यामुळे शिक्षणप्रेमी मधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. औराद पंचायत समिती व हतुर जिल्हा परिषद गटातील मतदाराने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मतदारसंघात शिक्षण सारख्या पवित्र कार्यक्रमात उघडपणे अपमान झाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
…………………
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*
ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!
सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.













