पोलीस प्रशासनामधील उत्कृष्ट कार्यामुळे विविध पुरस्कार
अहिल्यानर : पोलीस दलातील प्रदीर्घ, उत्कृष्ट व उल्लेखनीय सेवेची दखल घेत अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागचे पोलीस उपअधीक्षक अजित बाळकृष्ण त्रिपुटे यांना केंद्रीय गृह विभागा तर्फे उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असताना भ्रष्टाचारा विरोधातील कारवायांमध्ये त्यांनी प्रभावी योगदान देत शासकीय कामकाजातील पारदर्शकता व प्रामाणिकपणा वाढविण्यासाठी उल्लेखनीय काम केले. कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, तपास कौशल्य आणि जनसेवेची भावना यामुळे अजित त्रिपुटे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव , अमरावती, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, रत्नागिरी, मुंबई येथे विविध पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, संगणक कक्ष, नागरी हक्क संरक्षण विभाग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात त्यांनी उल्लेखनीय सेवा बजावली आहे.
अजित त्रिपुटे यांना यापूर्वी सन 2020 मध्ये पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पदक प्राप्त झाले आहे. तसेच सन २०११-१२ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उत्कृष्ट तपास अधिकारी’ म्हणून मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
कोल्हापूर व अमरावती जिल्ह्यामध्ये गुन्हे शाखेत कार्यरत असताना खून, दरोडा , जबरी चोरी व घरफोडी यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणले . चंदगड पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर खुनाच्या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्यात यश मिळविले. तसेच गोकुळ- शिरगाव येथील स्फोटक पदार्थांशी संबंधित गुन्ह्याची तांत्रिक तपासाच्या माध्यमातून उकल केली.
सोलापूर जिल्ह्यात विशेष शाखेत नेमणुकीस असताना 2014 च्या विधानसभा व 2019 च्या लोकसभा निवडणुकी वेळी निवडणूक कक्ष अधिकारी म्हणून काम पाहिले . पंढरपूर आषाढी वारीच्या काळात पोलीस प्रशासन व वारकरी संप्रदाय यांच्यात समन्वय साधण्यासाठी समन्वय अधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण काम केले. मंद्रूप पोलीस ठाणे येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना गुन्हेगारी कमी करून जनता आणि पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद वाढविला होता. तसेच गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यात यश मिळविले होते.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*











