दक्षिणच्या मासिक मिटींगमध्ये विविध विषयावर चर्चा
दक्षिण सोलापूर.. जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडून येऊन सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी अनेक अधिकारी प्रशासक राजवटीसारखे राहत आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी टाळाटाळ करीत आहेत . त्यामुळे लोकप्रतिनीधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय विकास कामे प्रलंबित राहत आहेत. म्हणून अधिकाऱ्यांनी प्रशासक राज्य संपल्याची जाणीव ठेवून पदाधिकाऱ्यांच्या नागरीकांची कामे करण्याचे आवाहन दक्षिण पंचायत समिती सदस्यांनी मासिक मिटींगमध्ये केली. सभापती संदीप टेळे मासिक बैठकीच्या
अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसभापती वर्षा पटणे, पंचायत समिती सदस्य पंचप्पा धनशेट्टी, विजय राठोड, सुरज पाटील, प्रियंका कुपसंगे, , शिल्पा बिराजदार, अंबिका दुपारगुडे , बीडीओ मनोज राऊत यांच्यासह अनेक विभागप्रमुख उपस्थित होते. यावेळी अनेक सदस्य उपस्थित होते.
यावेळी सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत तालुक्यातील वीज, पाणी, रस्ता, घरकुल बिल या विषयावरील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा वर नाराजी व्यक्त केली. पंचायत समिती सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना अनेक विभाग प्रमुखांनी उत्तर देण्याचे टाळून मौन धारण केल्याने सदस्य आक्रमक झाले होते.
पावसाने तीन महिन्यांपासून दडी मारल्यामुळे दक्षिणमध्ये पाणीटंचाई समस्या निर्माण होणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याची सदस्यांनी मागणी केली. पाणीटंचाई सोडवण्यासाठी बोअर तसेच इतर अनेक उपाययोजना करणार असल्याचे सांगण्यात आले . अनेक शाळांमध्ये लहान मुलांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी त्यांची वणवण सुरू आहे. त्यामुळे शाळांमध्ये पाण्याची सोय करण्याची सूचना सदस्यांनी मांडली . शाळांच्या शौचालयातील घाणीचा व दुर्गंधीचा प्रादुर्भाव विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत किंवा शाळेतील शिक्षकांनी लोकसहभागातून शौचालय स्वच्छ करण्याची सूचना करण्यात आली. विविध योजनेतील घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही जिओ टॅगिंग अभावी बिल मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे जिओ टॅगिंग करण्यासाठी कर्मचाऱ्यांची रिक्त जागा भरून लाभार्थ्यांना घरकुल अनुदान देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले . होटगीच्या सदस्या अंबिकाताई पाटील यांनी शिक्षकांनी तंबाखू न खाण्या बाबत आदेश काढण्याची मागणी केली. दक्षिणचे तहसीलदार यांना मासिक मिटींगला उपस्थित राहण्याबाबत पत्र देऊनही गैरहजर राहत असल्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
बीडीओंचा अभिनंदन व सत्कार
दक्षिणचे बीडीओ मनोज राऊत यांनी विद्यार्थ्यांमधील इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी नवीन उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषा सुधारत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय एकदिवसीय प्रतीकात्मक सरपंच या उपक्रमामध्येही बीडीओंनी विशेष योगदान दिल्यामुळे पंचायत समिती सदस्यांकडून त्यांचा अभिनंदन करून सत्कार करण्यात आला .
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*












