अश्लील टिप्पणीचा ओबीसी संघर्ष समितीकडून निषेध
सोलापूर : महाराष्ट्रात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा आणि त्यातून महाराष्ट्राचे राजकारण विद्वेषाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून सुरू असल्याचा आरोप ओबीसी संघर्ष समिती, सोलापूरच्या वतीने करण्यात आला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल अश्लील टिप्पणी करून त्यांच्या कुटुंबीयांबाबतही आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करत समितीच्या वतीने बावनकुळे यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आला.
महाराष्ट्राची सामाजिक रचना ही विविध समाजघटकांच्या परस्पर सहकार्यावर आणि बंधुभावावर उभी आहे. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचा कोणताही प्रयत्न महाराष्ट्राच्या सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने घातक आहे. राजकीय मतभेद असू शकतात; मात्र वैयक्तिक पातळीवर जाऊन अश्लील भाषा वापरणे, कुटुंबीयांना लक्ष्य करणे किंवा अपमानास्पद वक्तव्ये करणे ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी बाब नसल्याचे समितीने म्हटले.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध करताना उपस्थितांनी अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजामध्ये अनावश्यक तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली. ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर ठामपणे भूमिका मांडणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करण्याऐवजी त्यांच्या धोरणांवर आणि निर्णयांवर वैचारिक पद्धतीने चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा समाजातील ऐतिहासिक सामाजिक संबंध कायम राहावेत, दोन्ही समाजांमध्ये सलोखा आणि बंधुभाव टिकून राहावा, यासाठी राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संयमाची भूमिका घेणे आवश्यक आहे. समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये टाळून विकास, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास राम वाकसे, उमेश कोळेकर, शेखर बंगाळे, राज बंडगर, काशिनाथ पोतदार, राजन दीक्षित, माधवी पोतदार, निमिषा वाघमोडे, अर्चना बंडगर, शशिकला कसपटे, आप्पाराव हक्के, राहुल पुजारी, अनिल माळी, शिवराज बंगाळे यांच्यासह ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*











