फळबागा व पिकांचे पंचनामा करून नुकसानभरपाई द्या..
सोलापूर…
सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके आणि फळबागा संकटात सापडल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे 60 टक्के पर्जन्यमानाची तूट असून केवळ 194 मिलिमीटर पाऊस झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. अनेक भागांत 21 दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. तसेच दुष्काळ परिस्थितीमुळे अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत असून नागरिकांना पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणून सर्व नियम बाजूला ठेवून सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती तथा अध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी यांनी केली.
जिल्हा परिषद सोलापूर येथे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांच्या अध्यक्षते खाली कृषी समितीची मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी समितीने सरकारकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषद सोलापूरच्या कृषी व पशुसंवर्धन समितीची सभा बुधवारी सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पीक कापणी प्रयोग, पीक विमा, सद्य पीक परिस्थिती, पर्जन्यमान तसेच पावसाच्या खंडामुळे पिके व फळबागांवर झालेल्या परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
पावसाअभावी शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त पिके आणि फळबागांचे पंचनामे विलंब न करता तात्काळ सुरू करावेत. तसेच पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही युद्धपातळीवर करावी, असे निर्देश सभापती चिवडशेट्टी यांनी प्रशासनाला दिले.
पर्जन्यमानातील मोठी तूट आणि दीर्घकाळाचा पावसाचा खंड यामुळे पिकांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ कागदी निकषांचा विचार न करता जिल्ह्यातील प्रत्यक्ष परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देणे गरजेचे आहे, अशी भूमिका सभापतींनी मांडली.
दरम्यान शेतकऱ्यांशी निगडित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा असलेल्या या सभेला महावितरण, आत्मा आणि महाबीज विभागांचे अधिकारी गैरहजर राहिल्याने समिती सदस्य अण्णा ढाणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबतच्या महत्त्वाच्या बैठकीला संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरिदास हावळे, सर्व समिती सदस्य, तालुकास्तरीय कृषी अधिकारी तसेच कृषी विस्तार अधिकारी उपस्थित होते.
————————————————————
नवप्रभात न्यूज पोर्टल – आपल्या हक्काचे व्यासपीठ*
*आपल्या भागातील प्रत्येक घडामोड, आता थेट आपल्या मोबाईलवर!*
ताज्या बातम्या, राजकीय घडामोडी, गुन्हेगारी वृत्त, शेती विषयक माहिती, शैक्षणिक बातम्या आणि आपल्या गावातील प्रत्येक लहान-मोठी बातमी प्रसिद्ध करण्यासाठी एकच विश्वासाचे नाव…
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*
आपली बातमी, आपली जाहिरात – लाखो वाचकांपर्यंत पोहोचवा तेही अल्प दरात!
सत्य, निर्भीड आणि जनतेच्या हिताची पत्रकारिता.











