सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत लोकसहभागातून चरणसेवा उपक्रम राबविण्यात येत आहे . यंदाच्या आषाढी वारीत राज्यातील १४ जिल्ह्यांतील ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी थेट चरणसेवा आणि आरोग्यसेवेचे लाभ घेतला.
आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना होणारा शारीरिक ताण, स्नायूदुखी, पायांना येणारे फोड, थकवा तसेच पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांचा धोका लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. मागील वर्षी सात जिल्ह्यांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा विस्तार करून तो दिंडी मार्गावरील १४ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आला.
जिल्ह्यांतील १४० मुक्कामस्थळांवर सेवा केंद्रे उभारण्यात आली. या केंद्रांमधून वारकऱ्यांना चरणसेवा, मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी, प्रथमोपचार, आवश्यक औषधांचे वितरण, रुग्णवाहिका सुविधा तसेच गरजेनुसार पुढील उपचारांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.
या उपक्रमात १६४ आरोग्य संस्थांनी सहभाग घेतला. ७ हजार ५३८ स्वयंसेवक तसेच ११ हजार ३३१ डॉक्टर, वैद्यकीय प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सेवाकार्यात योगदान दिले. सेवेसाठी १० हजार टी-शर्ट आणि ३ हजार लिटर आयुर्वेदिक औषधी तेलाचा उपयोग चरणसेवेसाठी करण्यात आला. तसेच ८ रथांद्वारे जनजागृती करण्यात आली. लोकसहभागातून साकारण्यात आलेल्या या उपक्रमातून तब्बल ४ लाख ९६ हजारांहून अधिक वारकऱ्यांना प्रत्यक्ष चरणसेवा आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात आली.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









