विशेष तपासणीव्दारे 770 वाहनांवर कारवाई
7 लाख 79 हजार रुपयांचा दंडाची कारवाई
सोलापूर : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. या वाहनांवर HSRP बसविण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. या मुदतीनंतर परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार सोलापूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने 1 जुलै ते 30 जुलै 2026 या कालावधीत HSRP न बसविलेल्या तसेच नियमबाह्य नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबविली.
या मोहिमेत 770 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण 7 लाख 79 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी 80 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले की, ज्या वाहनधारकांनी अद्याप HSRP बसविले नाही, त्यांना परिवहन विभागाच्या विविध ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येणार नाही. यामध्ये वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, वाहनावरील कर्जाची नोंद चढविणे किंवा कमी करणे, वाहनाची पुनर्नोंदणी तसेच परवान्याचे नूतनीकरण आदी सेवांवर निर्बंध राहणार आहेत.
ज्या वाहनधारकांनी अद्याप HSRP नंबर प्लेट बसविलेली नाही, त्यांनी पुढील दंडात्मक कारवाई व कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यामार्फत तातडीने HSRP बसवून घ्यावी. आगामी काळातही ही विशेष तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी नमूद केले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













