औरादच्या सर्कलची चौकशी करण्याचे प्रांतअधिकार्यांचे आदेश
नोंद रखडलेल्या शेतकर्यांना न्याय देण्याची मागणी
दक्षिण सोलापूरः औरादचे सर्कल म्हणून सरकाझी यांची नेमणूक झाल्यापासून शेत व प्लाट खरेदी विक्री नोंद रखडल्याची शेतकर्यांनी तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे शेतकर्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी ( प्रांतअधिकारी ) यांनी तांत्रिक व इतर कारणामुळे नाकारलेल्या नोंदींची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मंद्रूपचे तहसीलदार विष्णु बुटे यांच्याकडून अवैद्य मुरूम उपसा व नाकरलेल्या नोंदींची चौकशी करण्यास टाळाटाळ होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रांतअधिकार्यांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदैश देण्यात आली आहे.
औरादचे मंडलअधिकारी म्हणून सरकाझी यांनी पदभार घेतल्यापासून अवैद्य उपसाकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार करण्यात आली आहे. अवैद्य मुरूम उपसामुळे शेतरस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने शेतकर्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पंचनामा सादर करण्यात आला. मात्र यावेळी निवृत्त तलाठी व ठेकेदार यांना वगळून शेतकर्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
औराद सर्कलमधील अनेक गावातील खातेदारानी शेत व प्लाॅट खरेदी केल्यानंतर नोंद घेण्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ करून तांत्रिक कारणामुळे नोंद फेटाळण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत सर्व नोंदींची फेरतपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्यानंतरही तहसीलदार बुटे त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. याशिवाय अनेक दाखले प्रलंबित असल्याच्या तक्रारीही प्रांतअधिकार्यांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे औरादचे सर्कल मनमानी कारभार करीत असल्याची सांगण्यात येते. मात्र तहसीलदार याची गांभीर्याने चौकशी करण्याऐवजी चालढकल करीत असल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
….
औरादच्या सर्कलना वरदहस्त कुणाचा ?
….
औरादचे सर्कल मनमानी करून शेतकरी व नागरीकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्यानंतरही त्यांची चौकशी करण्यास टाळाटाळ होत आहे. त्यामुळे मनमानी कारभार करणार्या अधिकार्यांवर वरिष्ठ अधिकारी अथवा लोकप्रतिनिधींचे वरदहस्त आहे का ? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.













