सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील ९५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ९५ हजार ६०३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहेत, अशी माहिती सहकार विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमुक्ती योजनेच्या ऑनलाईन लाभ वितरणास शुक्रवारी ७ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली. यामध्ये कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत पुणे जिल्ह्यातील ३८ हजार ९७० पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर ३४५ कोटी २५ लाख ५ हजार ५९४ रुपये जमा करण्यात आले आहेत. यात सातारा जिल्ह्यातील १९ हजार ५८ शेतकऱ्यांना १४२ कोटी ७ लाख ३९ हजार २८४ रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील ११ हजार ३९४ शेतकऱ्यांना १२८ कोटी १० लाख ४४ हजार १६१ रुपये याप्रमाणे ६९ हजार ४२२ शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण ६१५ कोटी रुपयाहून अधिक रक्कम कर्ज खात्यावर जमा करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील ७५, दक्षिण सोलापूर १२५, पंढरपूर ५५८, सांगोला २७६, माळशिरस ५९८, बार्शी १६७, करमाळा ४५७, मोहोळ ३४२, माढा ३४८, अक्कलकोट ९३ आणि मंगळवेढा ७३७ तसेच राष्ट्रीय व इतर बॅकेमार्फत १५ हजार ९५५ एकूण १९ हजार ७३१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण शुक्रवारपर्यंत पूर्ण झाले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. आधार प्रमाणीकरण करुन घेतल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा होणार आहे तसेच नवीन पीक कर्ज घेण्यासही शेतकरी पात्र होणार आहेत, त्यामुळे आपले आधार प्रमाणीकरण करुन करुन घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













