आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार ५०० विशेष एसटी गाड्या -परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक
पंढरपूर :- आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्राकाळात ५ हजार ५०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे.
राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. या विशेष बस सेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती कायम राहणार असल्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले .
आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक,पंढरपूर येथे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर, नगराध्यक्षा श्रीमती प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, सहा. पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नेरपगार, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, विभागीय वाहतूक नियंत्रक अमोल गोंजारी व एसटी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवास, तर महिलांना ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. भाविकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून विशेष बसची नोंदणी करावी असे आवाहन परिवहन मंत्री श्री सरनाईक यांनी केले.

मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने ५ हजार १४५ विशेष बसेस चालवून तब्बल २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा त्याहून अधिक सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. एकादशीच्या दिवशी लाखो भाविक परतीच्या प्रवासाला निघत असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच वारकरी भाविकांसाठी पंढरपूर व परिसरात चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. या स्थानकांवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









