मंद्रूपचा सागर शेजाळ बनला ‘राष्ट्रीय प्रशिक्षक’!
मंद्रूप…
आजच्या काळात आपल्याला बर्याच गोष्टी सहज उपलब्ध होतात. हातात महागडा स्मार्टफोन, सोयी-सुविधा, शिक्षणाच्या आणि करिअरच्या शेकडो संधी. तरीही आजचा तरुण बऱ्याचदा छोट्या-छोट्या अडचणी आल्या की निराश होतो. ” माझ्याकडे हे नाही ,” ” माझे नशीबच खराब आहे,” किंवा “मला वातावरण तसे मिळाले नाही” अशी कारणे शोधत स्वतःचे अपयश लपवण्याचा प्रयत्न करतो. पण खरंच, यश हे सुविधांवर अवलंबून असते की तुमच्या आतल्या जिद्दीवर?
या प्रश्नाचे जिवंत उत्तर शोधायचे असेल, तर मंद्रूपच्या पैलवान सागर मारुती शेजाळ याच्या संघर्षाचा पट एकदा डोळ्यांसमोरून घालवला पाहिजे. सागरची कहाणी केवळ एका पैलवानाच्या संघर्षाची नाही, तर संकटसमयी संपूर्ण गावाने आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन एका गरिबाच्या लेकाला कसे मोठे केले, या ‘लोकसहभागाची’ ही एक यशोगाथा आहे.
मंद्रूप युवा क्रीडा प्रशिक्षक सागर शेजाळ यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पंजाब राज्यातील पटियाला येथे आयोजित सहा आठवड्यांच्या स्पोर्ट्स कोचिंग सर्टिफिकेट कोर्समध्ये यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करून राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
मे- जून २०२६ या कालावधीत आयोजित या प्रशिक्षणामध्ये सागर यांनी कुस्ती या विषयात विशेष प्रशिक्षण घेतले. अंतिम परीक्षेत त्यांनी ३०० पैकी २३० गुण मिळवत ‘A’ ग्रेड प्राप्त केला. हा कोर्स देशातील क्रीडा प्रशिक्षकांना आधुनिक प्रशिक्षण पद्धती, तांत्रिक कौशल्य, खेळाडूंची शारीरिक व मानसिक तयारी, तसेच राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित केला जातो.
९० च्या दशकातील मंद्रूपकरांच्या आठवणीत आजही एक चेहरा अगदी ताजा आहे. डोक्याला रुमाल बांधून, हाताने गाडा ढकलत गल्लोगल्ली बर्फ/गारेगार विकणारे मारुती शेजाळे. २५-५० पैसे किंवा एका ग्लास ज्वारीच्या बदल्यात लहान मुलांना थंडगार गोळा देऊन तृप्त करणारा तो हसरा आणि तजेलदार चेहरा आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. पुढे मारूती पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून रुजू झाले. पण नियतीचा खेळ विचित्र असतो. २००८ मध्ये नांदणी येथे एका अपघातात मारुती याचे निधन झाले आणि शेजाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
पतीचे छत्र हरपल्यानंतर लक्ष्मी शेजाळ रडत बसले नाहीत .पोटच्या तिन्ही गोळ्यांना म्हणजे सोमनाथ, कृष्णा आणि सागरला घेऊन त्या संकटाशी दोन हात करायला उभ्या राहिल्या. पोलीस ठाण्यात साफसफाईचे काम करून त्यांनी मुलांचे पोट भरले. मोठा भाऊ सोमनाथ (B.A.) आणि कृष्णा (M.Com.) यांनी आईच्या दुःखाला सावरले आणि धाकट्या सागरला घडवण्यासाठी स्वतःचा आधार दिला. आईने मुलांना फक्त अन्नाचा घास दिला नाही, तर “पतीची ओळख मुलांच्या कर्तृत्वातून जिवंत ठेवेन” या निश्चयाने त्यांच्यावर कष्टाचे व स्वाभिमानाचे संस्कार केले.
कुस्तीचा कोणताही कौटुंबिक वारसा नसताना सागरने लाल मातीत उतरण्याचे स्वप्न पाहिले. पण पैलवानकीचा खर्च गरिबीच्या आवाक्या बाहेरचा होता. अशा वेळी मंद्रूपची माती आणि समाजातील देवमाणसं सागरच्या पाठीशी उभी राहिली. माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी सागरची आवड पाहून त्याला स्वतःच्या खर्चाने पहिल्यांदा फडात उतरवले.लोकसेवा विद्या मंदिराचे प्राचार्य श्रीधर टेळे, नंदकुमार टेळे आणि प्रसाद शेंडगे यांनी ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च उचलला.पोलीस निरीक्षक अजित त्रिपुटे व संदीप धांडे यांनी सातत्याने आर्थिक मदत आणि मार्गदर्शन केले.२०१० मध्ये ‘श्री मळसिद्ध केसरी’ मैदानात ५ वीत असणाऱ्या सागरची कुस्ती पाहून पै. आबासाहेब (बापू) मदने यांनी त्याचा संपूर्ण खर्च उचलत त्याला पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात (काकासाहेब पवार तालीम) दाखल केले. सतीश वेर्णेकर (राधा ज्वेलर्स) यांनी गेली ३ वर्षे सागरच्या खुराकासाठी दरमहा ५,००० रुपयांचे मानधन देऊन या प्रवासाला बळ दिले.
२०१९ मध्ये डाव्या हाताला गंभीर फ्रॅक्चर झाले असताना, वर्षभर रुग्णालयात उपचार घेत सागरने हार मानली नाही. आबासाहेब मदने यांच्या साथीने आणि स्वतःच्या जिद्दीने तो पुन्हा लाल मातीत उतरला. ऑल इंडिया चॅम्पियन, कुमार महाराष्ट्र केसरी या पदव्या मिळवून आणि B.A. Civil Services ग्रॅज्युएट होऊनही सागरचे पाय आजही जमिनीवर आहेत.
सागर, आज समस्त मंद्रूपकरांना तुझ्याकडून एक मोठी अपेक्षा आहे. ज्या खडतर परिस्थितीतून तू यशाला गवसणी घातलीस, त्याच जोरावर उद्या आपल्या भागातील तरुण मुलांना कुस्ती व मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी तू एक ‘प्रशिक्षक’ (Coach) व ‘मार्गदर्शक’ म्हणून मोलाचे योगदान देशील. महाराष्ट्र आणि देशाच्या क्रीडापटलावर काम करताना आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना National आणि International पातळीवर पोहोचवण्यासाठी तुझे मार्गदर्शन दीपस्तंभ ठरेल , यात शंका नाही.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*








