शाखा अभियंत्यांच्या ‘त्या’ कामांची चौकशी करण्याची मागणी
दक्षिण सोलापूर …
बदली होऊन महिना उलटला आणि अधिकृतपणे पदभारही सोपवला, तरीही दक्षिण सोलापूर बांधकाम विभागातील रस्ते विकास कामांची लाखो रुपयांची बिले काढण्यासाठी एका शाखा अभियंत्याकडून जोरदार खटाटोप सुरू असल्याची खळबळजनक चर्चा सध्या रंगली आहे. दक्षिण बांधकाम विभागातील शाखा अभियंता विलास कोंडगुळे यांच्या कार्यकाळातील संशयास्पद मोजमाप पुस्तकांची (एमबी) आणि निकृष्ट कामांची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जुलै महिन्यात प्रशासकीय बदल्यांचे सत्र राबवले. यामध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली. या बदली प्रक्रियेत दक्षिण बांधकाम विभागातील शाखा अभियंता विलास कोंडगुळे आणि गृहनिर्माण अभियंता राम जेऊरे यांचा समावेश होता. आदेशानुसार अभियंता जेऊरे यांनी तत्परतेने दक्षिणचा पदभार सोडून मुख्यालयात आपले कामकाज सुरूही केले आहे.
दुसरीकडे, शाखा अभियंता कोंडगुळे यांनी कागदोपत्री ६ ऑगस्ट रोजीच आपल्या पदाचा प्रभार सोपवला आहे. परंतु, पदभार सोडल्यानंतरही त्यांचा दक्षिण बांधकाम विभागातील वावर आणि ‘इंटरेस्ट’ कमी झालेला नाही. दक्षिणमधील अनेक गावांमध्ये झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची प्रलंबित बिले मंजूर करून घेण्यासाठी त्यांची पडद्यामागून मोठी धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे.
१५ दिवसांत रस्ता पूर्ण? संशय बळावला
सामान्यतः एखादा दर्जेदार काँक्रीट रस्ता तयार करण्यासाठी आणि तो वाहतुकीसाठी योग्य होण्यासाठी किमान महिन्याभरापेक्षा अधिक कालावधी लागतो. परंतु, या विभागात चक्क १५ दिवसांतच घाईघाईने रस्ते पूर्ण दाखवून त्यांची देयके (बिले) काढण्याची घाई सुरू आहे. हा सर्व प्रकार अर्धवट आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामांना मंजुरी देऊन शासकीय निधी हडप करण्याचा तर भाग नाही ना, असा संशय या घाईगडबडीमुळे निर्माण झाला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?
शाखा अभियंत्याने पदभार सोडलेला असतानाही, जुन्या कामांच्या बिलांसाठी सुरू असलेल्या या हालचालींकडे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याची चर्चा बांधकाम वर्तुळात आहे. या कथित दुर्लक्षामुळे संपूर्ण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
चौकशीची वाढती मागणी
बदलीच्या दिवसापासून शाखा अभियंता कोंडगुळे यांनी नोंदवलेल्या मोजमाप पुस्तकातील (MB) सर्व नोंदींची, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पुनर्तपासणी करण्यात यावी. रस्त्यांचा दर्जा निकृष्ट किंवा कामे अर्धवट आढळल्यास ही बिले त्वरित रोखण्यात यावीत आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून व नागरिकांमधून केली जात आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*












