लिंगायतामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र
सोलापूर –
खुल्या प्रवर्गातील लिंगायतांची आर्थिक लाभाच्या आणि सवलतीच्या योजनांची मागणी असताना त्याकडे दूर्लक्ष करून लिंगायतामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र रचून अमृत योजनेचे गाजर दाखविण्यात आले आहे.ही योजना केवळ एक फसवे मृगजळ आहे. असा घणाघाती आरोप सकल लिंगायत महासमितीचे राज्य समन्वयक डाॅ.बसवराज बगले यांनी केला आहे.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने नुकताच एक आदेश काढून अमृत योजनेच्या गटात ” हिंदू वीरशैव लिंगायत ” यांचा समावेश केला आहे.ही एक निव्वळ राजकीय खेळी असून समाजात दुफळी माजविण्याचा प्रकार आहे. कारण महाराष्ट्रात ” हिंदू वीरशैव लिंगायत “असा उल्लेख असणारे १০০ लोकांचे सुध्दा जातीचे दाखले नाहीत.मग किती लोकांना याचा लाभ मिळणार आहे,हा तर खरा संशोधनाचा विषय आहे.
अमृत योजनेतून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दूर्लभ घटकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि त्यासाठी नाममात्र अनुदान देण्याची तरतूद आहे.मग लिंगायत समाजबांधव हा खुल्या प्रवर्गातील लाभार्थी होऊ शकतो,मात्र आजपर्यंत शासनाने यासाठी किती निधी दिला,किती जणांनी याचा लाभ घेतला ? याची आकडेवारी सरकारकडे नाहीच.लिंगायत समाजाच्या एकाही व्यक्तीने ” अमृत योजनेत हिंदू वीरशैव लिंगायत ” या जातीचा समावेश करण्याची मागणी शासनाकडे केलेली नाही.मग अचानकच सामाजिक न्याय विभागाला एवढा पुळका का आला असा सवाल डाॅ.बगले यांनी केला आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून शासन आदेश प्रसिद्ध झाला आहे.तो फसवा ” आदेश म्हणजे शासन निर्णय ” नंव्हे, ज्यांच्याकडे फक्त ” लिंगायत ” असा उल्लेख असणारी कागदपत्रे आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही का ? हा गहन प्रश्न आहे. लाभ मिळणारच असेल तर मग हिंदू वीरशैव लिंगायत हा शब्दप्रयोग करण्याचा डाव कुणी आणि का आखला आहे.असा सवालही त्यांनी केला आहे.
● जनगणनेसाठी अमृतचे गाजर●
लवकरच धर्माची नंव्हे तर जातीची गणना होणार आहे.राज्यात कोट्यावधी लिंगायत समाजबांधव आपली वेगळी धार्मिक परंपरा जोपासत असून ” धर्म म्हणून लिंगायत ” अशीच नोंद करणार आहेत.अशा वेळी अमृत योजनेचे विषारी गाजर दाखवून लिंगायत समाजात फूट पाडण्याचा डाव काही अदृश्य शक्तींनी आखला आहे.त्याला लिंगायत समाज भीक घालणार नाही.अशीही संतप्त प्रतिक्रिया बगले यांनी दिला आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*














