मंद्रूपमध्ये लोकसेवा विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची शिवभक्तीची नयनरम्य दिंडी
—
मंद्रूप : ‘माडरी मल्लय्यान ध्यान, आगीतू जन्मद पावन! हर हर मल्लिनाथ अरसा, गुडी मॅग भंगारद कळसा! श्री मल्लिकार्जुन महाराज की जय’च्या जयघोषात आणि शिवनामाच्या नामस्मरणात मंद्रूप नगरी दुमदुमून गेली. लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या भव्य दिंडी सोहळ्यामुळे गावात शिवभक्तीचे चैतन्य निर्माण झाले. 
सालाबादप्रमाणे यंदाही श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारचे औचित्य साधून लोकसेवा विद्यामंदिरच्या वतीने ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवाच्या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध सांस्कृतिक आणि धार्मिक वेशभूषांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शिवप्रतिमेची आकर्षक रांगोळी, शंकर-पार्वती, गणपती, सारा अयनोर, विणेकरीच्या वेशातील मुले, अंगावर काटा आणणारे अघोरी शिव नृत्य, फुगड्या, ढोल-झांज, बहारदार लेझीम, वीरभद्र पुरवंत, कुंभमेळा, नंदीध्वज तसेच वृक्षदिंडी, साक्षरता प्रचार रथ, पारंपरिक टाळ, सनई, हलगी, संबळ आणि शाळेचे बँड पथक व NCC च्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवला. यामुळे संपूर्ण गाव शिवमय झाले होते.
या मिरवणुकीत माजी सभापती तथा संस्था सचिव गुरुसिद्ध म्हेत्रे, माजी युवा सरपंच तथा सहसचिव पिरप्पा म्हेत्रे, नागनाथ म्हेत्रे, माजी सरपंच हेमंतकुमार स्वामी, महादेव शिळ्ळे, शरणू बडगे, माजी केंद्रप्रमुख शंकर म्हेत्रे, राजकुमार कुंभार, प्राचार्य बसप्पा घाटे, उपमुख्याध्यापक मदगोंडा मलकारी, पर्यवेक्षक शिवपुत्र म्हेत्रे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले. या दिंडीत बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













