जिल्हास्तरीय सल्लागार समितीची आढावा बैठक संपन्न
सोलापूर :- जिल्ह्यातील बँकांना खरीप हंगामसाठी 2 हजार 858 कोटी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून जून अखेर पर्यंत 1 हजार 650 कोटी वाटप केले आहे. ते उद्दिष्टाच्या 57% आहे. खातेदारांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे सर्व बँकांनी पीक कर्ज रकमेचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करत असताना खातेदारांची संख्या ही 75 टक्के असली पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करत होते. यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक मानस झा, आरबीआयचे श्री. राव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार, सहाय्यक उपनिबंधक आबासाहेब गावडे, जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले, आरसेटीचे संचालक दीपक वडेवाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत, खाजगी तसेच जिल्हा सहकारी बँकेचे जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन पुढे म्हणाले की, ज्या बँका पीक कर्जाच्या रकमेबरोबरच खातेदाराच्या संख्येचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत, अशा बँकाकडील शासकीय ठेवी काढून घेण्यात येतील व ज्या बँका उद्दिष्ट पूर्तता करतील अशा बँकांमध्ये त्या ठेवी हस्तांतरित करण्यात येतील याची बँकांनी नोंद घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सर्व बँकांनी शासकीय योजनांची कर्ज प्रकरणे मंजूर केली पाहिजे तसेच रिजेक्ट करत असताना त्याचे नेमके कारण नमूद केले पाहिजे. बँकाच्या सर्व जिल्हा समन्वयक यांनी त्यांच्या बँकाच्या सर्व शाखांना याबाबतची माहिती परिपत्रक काढून तात्काळ द्यावी. ज्या बँकेच्या शाखा मधून कर्ज प्रकरण रिजेक्ट चे कारण नमूद केले जाणार नाही अशा बँकाबाबत कठोर निर्णय घेण्यात येतील असे निर्देशही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले. जास्तीत जास्त खातेदारांना वित्तपुरवठा करण्याबाबत कार्यवाही करावी, असेही त्यांनी सुचित केले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*













