राज्यातील शाळांमध्ये २८,००० हून अधिक शिक्षकेतर पदांची मेगाभरती;
राज्य शासनाचा मोठा निर्णय
मुंबई: राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः व पूर्णतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील रखडलेल्या २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने या मेगाभरतीसाठी नवीन नियमावली जाहीर केली असून, शासन निर्णयानुसार ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आत्तापर्यंत शासन मान्यतेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता शासनाकडून अधिकृत मान्यता मिळणार आहे.
शाळांमधील प्रशासकीय कामांचा वाढता ताण कमी करण्यासाठी आणि रिक्त पदे त्वरित भरण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाच्या नवीन नियमांनुसार, शिक्षकेतर कर्मचारी संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ८० टक्के पदे सरळसेवा भरतीने भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कनिष्ठ लिपिक , पूर्णवेळ ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहाय्यक या पदांचा समावेश आहे.
या पदभरतीसाठी शासनाने काही महत्त्वाचे नियम आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. थेट सरळसेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी शाळा संस्थांना पदोन्नतीचा मार्ग अवलंबणे बंधनकारक राहणार आहे. पात्र कर्मचारी उपलब्ध नसल्यास, अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि त्यानंतरच उर्वरित जागा सरळसेवेने भरता येतील. संपूर्ण भरती प्रक्रियेला पारदर्शक बनवण्यासाठी ती ऑनलाइन स्वरूपात राबवली जाईल. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी स्वतंत्र ‘नॉन टीचिंग वैयक्तिक मान्यता पोर्टल’ विकसित करण्यात आले आहे, ज्यामुळे कामाला गती मिळेल. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित शिक्षणाधिकारी किंवा विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून मंजूर, कार्यरत आणि रिक्त पदांची संख्या तपासून सुधारित आकृतिबंधानुसार मंजुरी घेणे आवश्यक आहे.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरील स्थगिती उठल्यामुळे शिक्षण वर्तुळातून आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. सुधारित आकृतिबंधानुसार शाळा संस्थांना आता लवकरच या पदभरतीची प्रत्यक्ष कारवाई सुरू करावी लागणार आहे.
………..
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














