सीईओ कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली ‘सेवा संकल्प’ अभियानाची सुरुवात!
सोलापूर: जिल्ह्यातील कचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेने मोठे पाऊल उचलले आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत व “स्वच्छता ही सेवा 2026” अंतर्गत “प्लास्टिकमुक्त गाव – स्वच्छ व निरोगी गाव” हे विशेष अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवले जात असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार व सर्व विभागांचे सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे.
गाव, शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठेत प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
रस्ते, नाले, नदीकाठ व सार्वजनिक ठिकाणांवरील प्लास्टिक कचरा श्रमदान मोहिमेतून गोळा केला जात आहे.
“ओला – सुका – प्लास्टिक कचरा वेगळा, गाव स्वच्छ आणि सुंदर” या मंत्राचा प्रचार करून घराघरातच कचरा वेगळा करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
ओल्या कचऱ्यापासून गावातच कंपोस्ट खत तयार केले जात असून, प्लास्टिक कचऱ्याचा MRF केंद्रावर पुनर्वापर केला जात आहे.
प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांच्या वापरासाठी महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले जात आहे.
शाळा व महाविद्यालयांमध्ये चित्रकला स्पर्धा, रॅली आणि प्लास्टिक संकलन स्पर्धांचे आयोजन केले आहे.
या अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या कुटुंबांचा, शाळांचा आणि ग्रामपंचायतींचा गौरव केला जाणार आहे. प्रत्येक गावाने “प्लास्टिक व कचरा मुक्त गाव” होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ आणि प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी केले आहे.
_______________________
* नवप्रभात न्यूज पोर्टल *
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294













