दक्षिणच्या ‘ड’ श्रेणीतील शाळांचा पायाभूत सुविधा दर्जा उंचावणार
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील ‘ड’ श्रेणीतील प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा परिषद आणि दक्षिण सोलापूर पंचायत समिती प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील २५ शाळांमध्ये मुला-मुलींसाठी नवीन स्वच्छतागृहे बांधण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात महत्त्वाची बैठक पार पडली. दक्षिण मधील होटगी स्टेशन, फत्ताटेवाडी व आहेरवाडी येथील एनटीपीसी कंपनीकडून 25 शाळांच्या शौचालयासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती संदीप टेळे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी, होटगी स्टेशन, फताटेवाडी व आहेरवाडी येथील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी एनटीपीसी कंपनीच्या सीएसआर फंडातून निधीबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे तालुक्यामधील ३ हजार ४२९ विद्यार्थ्यांसाठी लाभ सुलभ शौचालयाची व्यवस्था होणार आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील एकूण ६६ ‘ड’ श्रेणीतील शाळांमध्ये सध्या स्वच्छतागृहांची अत्यंत गरज आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ३ हजार ४२९ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुविधेचा प्रश्न याद्वारे सुटणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची, विशेषतः मुलींची गैरसोय दूर करण्यासाठी सभापती संदीप टेळे व बीडीओ मनोज राऊत यांनी या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. सीईओंच्या दालनात झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे एनटीपीसीकडून या निधीला लवकरच मंजुरी मिळणार आहे.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294














