अजित पवारांच्या विमाना अपघाताची कसून चौकशी व्हावी -प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे
सोलापूर…
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून, सर्वपक्षीय सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे राष्र्टवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
खा. तटकरे यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ, तुळजा भवानी मंदिर आणि विठ्ठल मंदिर पंढरपूर येथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी बारामतीतील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या ५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, हा पक्षासाठी भावनिक आणि महत्त्वाचा क्षण आहे. बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. शरद पवार यांच्या पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडूनही उमेदवार न देण्याची भूमिका अपेक्षित आहे. काँग्रेससोबतही आमचा संपर्क सुरू असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या चार दशकांत अजित पवार यांनी बारामतीत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अकाली निधनानंतर होत असलेली ही निवडणूक बिनविरोध व्हावी, हीच सर्वांची नम्र अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या सर्व आमदारांना बारामतीत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शरद पवार आणि पवार कुटुंबीयांनाही अर्ज दाखल कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येणार आहे.
….
अजित पवार यांच्या विमान अपघाताची एस.आय.टी. चौकशी व्हावी
…
अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकाला अटक करण्याची मागणी केली असून, तीच भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने होऊन, सर्व शंकांचे निरसन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जय पवार हे पक्षाचे युवा नेतृत्व असून, त्यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.
________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*















