गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान
दक्षिण सोलापूर…
शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण प्रयोग आणि निष्ठापूर्ण योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाचा मानाचा “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार – २०२४” निंबर्गीचे प्रगतिशील शेतकरी गंगाधर बिराजदार यांना प्रदान करण्यात आला. मुंबई येथे राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
शून्यातून स्वतःचा शेतीचा प्रवास उभा करत बिराजदार यांनी द्राक्ष, बेदाणा, सेंद्रिय शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जलसंधारण आणि कृषी नवकल्पना यांच्या माध्यमातून शेतीमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान केला आहे.
तूर पिकामध्ये प्रति एकर १६ क्विंटल विक्रमी उत्पादन घेऊन त्यांनी विशेष यश संपादन केले असून, त्यांच्या या कामगिरीची दखल केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.
द्राक्ष पिकातून उच्च दर्जाच्या बेदाणा उत्पादनाचा यशस्वी प्रकल्प उभारून त्यांनी मूल्यवर्धनाला चालना दिली. उत्कृष्ट दर्जाचा बेदाणा तयार करून बाजारपेठेत सर्वोच्च दर मिळविण्यात त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.अलीकडेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित १० दिवसीय इस्राईल आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊन त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन, संरक्षित शेती आणि मूल्यवर्धन प्रक्रियेचा सखोल अभ्यास केला. या दौऱ्यातील अनुभवांचा उपयोग करून ते परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवत आहेत.
शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग, जलव्यवस्थापन, सेंद्रिय शेती, मूल्यवर्धन, शेतकरी संघटन आणि सामाजिक कार्य या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने श्री. गंगाधर दादा बिराजदार यांना “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार – २०२४” प्रदान करून त्यांच्या कार्याचा सर्वोच्च सन्मान केला आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार राज्यातील प्रगतिशील आणि शेतीनिष्ठ शेतकऱ्यांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. बिराजदार यांना मिळालेल्या या सन्मानामुळे निंबर्गीसह संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*








