शेतकऱ्यांचा फार्मर आयडी किंवा आधार क्रमांक आवश्यक
सोलापूर: रब्बी हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात खत वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. २२ ऑक्टोबर पासून जिल्ह्यातील सर्व खत विक्रेत्यांना QR कोडच्या माध्यमातून फार्मर आयडी किंवा आधार क्रमांक वापरूनच खत विक्री करणे बंधनकारक असणार आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, कृषी विकास अधिकारी हरी हावळे यांच्यासह खत कंपन्यांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या नवीन FFS (Fertilizer Flying Squad) प्रणालीनुसार हा बदल करण्यात आला आहे. यामुळे खतांचा साठा, विक्रीची नोंद आणि वितरण अधिक प्रभावी व पारदर्शक होणार आहे. सर्व खत विक्रेते, वितरक आणि कंपन्यांनी शासनाच्या निर्देशानुसार प्रणालीची तयारी पूर्ण करावी. १९ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत विक्रेत्यांनी प्रत्यक्ष साठा आणि POS मशीनमधील साठा यात तफावत ठेवू नये. चुकीची नोंद किंवा साठा लपवल्याचे आढळल्यास खत नियंत्रण आदेश १९८५ आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. FFS ॲपबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी कृषी विभाग, खत कंपन्या आणि कृषी सेवा केंद्रांनी समन्वयाने गावोगावी प्रशिक्षण आणि प्रचार करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
नवीन प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदीत अडचण येऊ नये याची दक्षता घेण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














