हुच्चे कुटुंबाकडून ‘लाडक्या’ म्हशीला सन्मानाने अखेरचा निरोप;
सोलापूर – सध्याच्या काळात तरुण पिढीला वृद्ध आई आणि वडील यांच्या अंत्यविधीला येण्यास वेळ नाही . त्यामुळे जन्म दिलेली मूल असताना बेवारस किंवा अनाथ म्हणून अंत्यविधी करण्यात येते . मात्र सोलापूर येथील हुच्चे कुटुंबाने म्हशीला केवळ प्राणी न मानता घरातील सदस्य म्हणून त्याची अंत्ययात्रा काढून सन्मानपूर्वक निरोप देताना दिला. माणूस आणि मुक्या प्राण्यामधील नातं हे केवळ व्यवहारापुरतं नसतं, तर ते कुटुंबातील एका सदस्यासारखं असतं, याची हृदयस्पर्शी प्रचिती मराठा वस्ती येथे पहायला मिळाली. हुच्चे कुटुंबाची शान असलेल्या ‘बांगडी’ नावाच्या लाडक्या म्हशीचे निधन झाल्यानंतर कुटुंबाने तिला जनावर न समजता घरातील सदस्याप्रमाणे सन्मानाने निरोप दिला. फुलांनी सजवून तिची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि भावपूर्ण वातावरणात सर्व विधी पार पडले.

आयुष्यभर कुटुंबाला साथ देणाऱ्या बांगडीच्या जाण्याने हुच्चे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “तिने आयुष्यभर आम्हाला साथ दिली, तिच्यामुळेच आमचा संसार उभा राहिला. त्यामुळे तिच्या शेवटच्या प्रवासात सन्मान देणे हे आमचे कर्तव्य होते,” अशी भावना हुच्चे कुटुंबीयांनी व्यक्त केली.
स्वार्थाच्या या युगात मुक्या जीवावर जीवापाड प्रेम करणारे हात आजही आहेत, याची साक्ष या घटनेने दिली आहे. हुच्चे कुटुंबाने दाखवलेल्या या कृतज्ञता आणि माणुसकीचे मराठा वस्तीसह पंचक्रोशीतून सर्वत्र कौतुक होत आहे.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*














