जैन मुनींच्या विशेष उपस्थितीने वेधले लक्ष
सोलापूर,:
जैन मुनींच्या पावन सानिध्यात भगवान महावीर यांच्या २६२५ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त मंगळवारी शहरात दिगंबर आणि श्वेतांबर जैन समाजाच्या वतीने संयुक्तपणे काढण्यात आलेली शोभायात्रा ‘न भूतो न भविष्यती’ अशी ठरली. शोभायात्रेची सुरुवात सकाळी ८ वाजता आचार्य शांतीसागर महाराज चौक (रंगभवन) येथे उत्साहात झाली. तत्पूर्वी सकाळी सात वाजता डॉ. सुहास रतिलाल करकमकर-शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण व वीरध्वज वंदन करण्यात आले. जैन महिला विकास मंडळाच्या महिलांनी ध्वज गीत सादर केले. यावेळी निर्यापक श्रमण मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांनी उपस्थितांना मंगल आशिष दिले. “भगवान महावीरांचे ‘जगा आणि जगू द्या’ हे तत्वज्ञानच जगाला शांतीचा मार्ग दाखवेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

‘त्रिशला नंदन वीर की, जय बोलो महावीर की’ आणि ‘वर्धमान महावीर की जय’ अशा जयघोषाने सोलापूर शहर दुमदुमून गेले.
सकाळी ८ वाजता निघालेल्या या शोभायात्रेत हत्ती, घोडे, १२ बग्गी आणि १०८ फुटांचा विशाल जैन ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. दिगंबर समाजाची चांदीची पालखी आणि श्वेतांबर समाजाची चांदीची बग्गी यात भगवान महावीर विराजमान होते.
यामध्ये जैन गुरुकुल, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सर्वोदय विकास प्रभावना ट्रस्ट, नवलबाई फुलचंद शाह कोठारी शाळा, खमितकर बालक मंदिर आणि लाल बहादूर शास्त्री हायस्कूलचे विद्यार्थी व कर्मचारी सहभागी झाले होते. कोठारी प्रशालेच्या लेझीम पथकाने आणि महिला-पुरुषांच्या भजन-दांडिया पथकाने शोभायात्रेत रंगत भरली.
कलेक्टर कचेरी येथून निघालेली ही शोभायात्रा विजापूर वेस, माणिक चौक, मधला मारुती, सराफ कट्टा मार्गे मंगळवार पेठ पोलीस चौकी येथे आली. याच वेळी जोडभावी पेठेतील श्री आदिश्वर मंदिराची मिरवणूक मुख्य शोभायात्रेत सामील झाली. 
याप्रसंगी श्वेतांबर समाजाचे आचार्य देव श्री दिव्येशसागरसुरीश्वरजी, साध्वी श्री चंद्ररत्नाश्रीजी तसेच दिगंबर समाजातील मुनिश्री १०८ विशालसागरजी, धवलसागरजी, मंथनसागरजी, मननसागरजी, विरलसागरजी महाराज आणि क्षुल्लक श्री १०५ विजितसागरजी महाराज उपस्थित होते.
हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आणि जैन श्वेतांबर आदेश्वर भगवान मंदिर ट्रस्टच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आणि सकल जैन समाजाने विशेष परिश्रम घेतले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*














