गुढी पाडवा व रमजान ईद सण झाल्यानंतर गॅस सिलेंडर साठी रांग लागणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन
सोलापूर:- गुढी पाडवा १९ मार्च व रमजान ईद हा सण २१ मार्च रोजी साजरा होत आहे. त्यानंतर 23 मार्च पासून जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीनी गॅस वितरणात एकसूत्रता राखण्याकरता गोदाम, गॅस एजन्सी व इतर ठिकाणाहून गॅस सिलेंडरचे वितरण करू नये. जिल्ह्यात सर्वत्र घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा ऑनलाईन बुकिंग झाल्यानंतर ओटीपी द्वारे ९६ तासात घरपोच करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
सोलापूर जिल्ह्यातील गॅस वितरण आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, एलपीजी गॅस पुरवठा करणारे जिल्हा समन्वयक अधिकारी भुकय्या रघुकुमार यांच्या सह सोलापूर शहर व जिल्ह्यातील गॅस एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर बाबत 23 मार्च पासून जिल्ह्यातील एकाही गॅस एजन्सी कडून रांगेत उभा राहून ग्राहकांना गॅस सिलेंडर देऊ नये. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर ओटीपी द्वारे ९६ तासात एजन्सीने ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडर उपलब्ध करून द्यावेत. आपल्या गॅस एजन्सी व गोदाम समोर ऑनलाइन बुकिंग, घरपोच सेवेद्वारे गॅस मिळेल एजन्सी मध्ये गॅस मिळणार नसल्याबाबतचे बोर्ड दर्शनी भागात लावावेत. तसेच त्याबाबतचे एसएमएस आपापल्या ग्राहकांना मोबाईलवर पाठवावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात एलपीजी चा पुरवठा मागणीप्रमाणे होत आहे. तरी संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचा दैनंदिन अहवाल प्रशासनाला सादर करावा. कंपनीच्या स्तरावर गॅस विक्रेत्यासाठी ज्या सूचना असतील त्या लेखी स्वरूपात गॅस विक्रेत्यांना द्याव्यात. दुसरे गॅस सिलेंडर वाटप शहरी भागात २५ दिवस तर ग्रामीण भागात ४५ दिवस आहे. त्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे. गॅस एजन्सीने कोणताही अवैध व्यापार होणार नाही याकरिता आपल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवावे. संवेदनशील गॅस एजन्सीची माहिती पुरवठा विभागाला द्यावी. त्याप्रमाणे त्या एजन्सीला पोलीस संरक्षण देण्याबाबत कळविण्यात येईल. तसेच पोलीस विभागाने रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गॅस एजन्सी समोर खरेदी होऊ नये याकरिता शहरी व ग्रामीण भागात पेट्रोलिंग करावे, असेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









