महसूल विभागात असणार ३५ हजार ८७६ पदे
सहा महसूल विभागांत ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये होणार
मुंबई : राज्य सरकारने तब्बल २० वर्षांनंतर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतिबंधाला मंजुरी दिल्याने आता महसूल विभागात एकूण ३५ हजार ८७६ पदे असतील. महसूल विभागातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी, या उद्देशाने राज्यातील सहा महसूल विभागांत ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये आणि ८ नवीन उपविभागीय कार्यालय, २ तहसीलदार कार्यालये, ६९ अतिरिक्त तहसीलदार कार्यालये स्थापन होणार आहेत.
नवीन कार्यालयांचे मुख्यालय आणि कार्यक्षेत्र निश्चित करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी स्तरावर वेगाने पूर्ण होणार आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क, भूमी अभिलेख आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांचा सुधारित आकृतिबंध आहे.
या नवीन संरचनेत विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवरील कार्यालयांचा समावेश आहे. यात ६ विभागीय आयुक्तालये, ३६ जिल्हाधिकारी कार्यालये, १९२ महसूल उपविभागीय कार्यालये आणि ३६० तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. तसेच क्षेत्रीय स्तरावर २ हजार ६२५ मंडळ कार्यालये आणि १५ हजार ७४७ तलाठी सजांची पदे मंजूर करण्यात आली आहेत.
…..
महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून, काळानुरूप वाढलेला कामाचा व्याप आणि लोकांच्या गरजा लक्षात घेऊन हा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात आला आहे. नवीन कार्यालयांमुळे जनतेला कामासाठी दूर जावे लागणार नाही.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री.
…..
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









