शिस्तभंग करणाऱ्यांना सीईओंनकडून नोटीस
सोलापूर ;
जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यानंतर सीईओ कुशल जैन यांनी जिल्हा परिषद मुख्यालयातील शिस्तीवरही भर दिला आहे. कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून बहुतांश कर्मचारी वेळेवर कार्यालयात दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. नव्या सीईओंच्या या भूमिकेमुळे प्रशासनात शिस्त लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाला शीस्त लावण्यासाठी व कामचुकार कर्मचार्यांवर वठणीवर आणण्यासाठी सीईओ जैन ‘ अॅक्शन मोडवर ‘ दिसून येत आहेत.
सीईओ जैन यांनी पदभार घेतल्यापासून पाच महत्त्वाच्या विभागांचा सविस्तर आढावा घेत प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनात हालचालींना वेग आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जैन हे जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाची कार्यपद्धती, रचना, कर्मचारी व्यवस्था आणि प्रलंबित प्रश्न समजून घेण्यावर भर देत आहेत. कोणती कामे रखडली आहेत, ती का प्रलंबित राहिली, त्यामागील कारणे काय आहेत, याचा बारकाईने आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामे मार्गी लावण्याच्या सूचना देत आहेत.
सीईओ जैन यांनी आतापर्यंत बांधकाम विभाग क्रमांक दोन, आरोग्य विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग, अर्थ विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेतला आहे. या विभागांतील विविध योजना, विकासकामे, निधीची स्थिती, प्रशासकीय निर्णय आणि रखडलेल्या प्रस्तावांची माहिती त्यांनी जाणून घेतली. तसेच येत्या पाच ते सहा दिवसांत उर्वरित सर्व विभागांचा देखील सविस्तर आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
__________________________________
*🛑नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*9423535294*









