हत्याकांडात आई, मुलगी व मुलगी यांचा जागीच मृत्यू
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील आई आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांची तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बोरामणी येथील मस्के कुटुंबाची तीन घरे असून मधल्या घरात गायत्री सुधाकर मस्के (वय ४२), त्यांची बारावीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी प्रिया मस्के (वय १८) आणि दहावीत शिकणारा मुलगा शिवराय मस्के (वय १६) हे तिघेजण राहत होते.

गायत्री मस्के या विधवा असून त्या आपल्या दोन मुलांसह स्वतःच्या घरात राहत होत्या. शेजारी त्यांचे सख्खे दिर राहत असल्याची माहिती समोर आली आहे. घर, शेतजमीन आणि कौटुंबिक वादातून हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या तिहेरी हत्येमुळे बोरामणी गाव हादरून गेले आहे. रात्रीच्या शांततेत घडलेल्या या रक्तरंजित घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे. या हत्याकांडामागील नेमका सूत्रधार कोण आणि हल्ल्याचे खरे कारण काय, याचा तपास पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
गुरुवारी रात्री उष्म्यामुळे तिघेही घराच्या गच्चीवर झोपले होते. रात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास अज्ञात इसमाने घराच्या गच्चीवर प्रवेश करून अचानक तलवारीने सपासप वार केल्याचे सांगण्यात येत आहे.
या हल्ल्यात गायत्री मस्के आणि त्यांची मुलगी प्रिया यांचा गच्चीवरच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेला शिवराय याचा बैठकीच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून पोलीस तपास करीत आहेत. आरोपीच्या शोधात तीन पथके पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
__________
नवप्रभात न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
संपादक :- अमोगसिद्ध मुंजे
9423535294









