सोलापूर जिल्ह्यात ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत फक्त पिण्याच्या पाण्याचे नियोजन – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
सोलापूर: अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाल्याने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ लागू करत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
जलसंपदा विभागाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येणार आहे. ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी सुरक्षित राहील यासाठी धरणनिहाय नियोजन होणार आहे. प्रत्येक धरणातील १०% जिवंत साठा बफर म्हणून राखीव ठेवला जाणार आहे.
सर्व महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींनी पाणी गळती रोखण्याची विशेष मोहीम राबवून १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात करावी. प्रत्येक उद्योगाने ३० टक्के पाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सांडपाणी प्रक्रिया करून तेच पाणी वापरण्याचे निर्देश. पिण्याचे पाणी, जनावरांचे पाणी आणि उद्योगाचे पाणी आरक्षित केल्यानंतर जे पाणी शिल्लक राहील तेच रब्बी हंगामासाठी दिले जाणार आहे. कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्यात यावे.
धरण, कालवे, नद्यांमधून होणारा बेकायदा पाणी उपसा थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*












