१.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
दक्षिण सोलापूर – महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या निर्मिती व विक्री करणाऱ्या टोळीचा मंद्रूप पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन जणांना अटक करून १ लाख ८० हजार ९५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंद्रूप पोलीस ठाण्याचे प्रभारी व परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक गणेश शिंदे यांनी मंद्रूप पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्या विरोधात मोहीम उघडली आहे. त्यामुळे अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. यापूर्वीही मंद्रूप पोलिसां कडून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांचे कौतुक होत आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अशोक यमनप्पा इलागेर (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता मंद्रूप पोलिस , अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. यामध्ये महिबूब महंमद हनीफ शेख (वय ४०, रा. मंद्रूप) आणि सद्दाम मकतुम मुल्ला (वय ३५, रा. बंदलगी बंधारा) यांच्या ताब्यातून मोठा साठा मिळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, शॉट लक्झरी च्युइंग टोबॅकोची शेकडो पाकिटे, १४ किलो बारीक सुपारी, ५६ किलो चुना, १२२ किलो मोकळे पाऊच, ३८ रबर पाकिटे, तसेच गुटखा तयार करण्यासाठी लागणाऱ्या २ बँड सीलर मशिन, ४ वजन काटे, १ सुपारी कटिंग मशिन व एक चारचाकी वाहन (MH 13 DL 8766) असे एकूण १.८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे करीत आहेत. या कारवाईमुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अवैध गुटखा विक्री रॅकेट उघडकीस आले आहे.
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*












