दुष्काळात मंद्रूपच्या शेतकऱ्यावर १३ व्या महिन्याचे संकट
मंद्रूप – यंदा पावसाळा सुरू होऊन चार महिने उलटले तरी पावसाचा पत्ता नाही. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. अशातच विहिरीतील जेमतेम पाण्यावर ८ ते १० महिने जगवलेला ऊस विजेच्या शॉर्टसर्किटमुळे जळून गेल्याने मंद्रूपच्या शेतकऱ्यावर दुबार संकट कोसळले आहे. मंद्रूप येथील शेतकरी भगवान गौरीशंकर सुतार यांचे मंद्रूप- कुरघोट रस्त्यावर शेत आहे. बुधवारी सकाळी विजेच्या कमी- अधिक दाबामुळे शॉर्टसर्किट झाले आणि ठिणगी थेट ऊसात पडली. क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. चार एकर ऊसापैकी दोन एकर ऊस शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत जळून खाक झाला.
परिसरातील शेतकऱ्यांनी विहीर आणि बोअरमधील पाणी आणून कसेबसे आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे उर्वरित दोन एकर ऊस बचावला. तोडणीला अवघे १५ ते २० दिवस बाकी असताना हा प्रकार घडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे हे घडल्याचा आरोप करत कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
या घटनेचा पंचनामा तलाठी रावसाहेब कोकरे यांनी करून शासनाला अहवाल सादर केला आहे.
“१० महिने जेमतेम पाण्यावर ऊस जगवला. आता तोडणी तोंडावर आली असताना ऊस जळून गेला. त्यामुळे माझ्यावर व कुटुंबावर दुष्काळात १३ वा महिना आला आहे. शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी.”
– भगवान सुतार, शेतकरी, मंद्रूप
________________
*बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा -*
*संपादक :- अमोगसिद्ध मुंजे*
*मो. 9423535294*












